क्रांतीसुर्य बी के कोकरे साहेब कोण होते ?

 क्रांतीसुर्य बी के कोकरे साहेब कोण होते?


*क्रांतीसुर्य बी के कोकरे साहेब कोण होते* ? 

आठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन 1990 च्या दशकात धनगर समाजाला सर्वप्रथम जागे करून समाजामध्ये क्रांतीची ज्योत पेटवून धनगर समाजाला एन.टी आरक्षण मिळून दिलं त्या वाघाचं नाव क्रांतीसुर्य बी के कोकरे साहेब होय.

बारामती तालुक्यातील उंडवडी क.प या छोट्याशा खेड्यामध्ये जन्म घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केमिकल इंजिनियर ची पदवी मिळवलेल्या बापूसाहेबांनी सर्वप्रथम एस.टी आरक्षणाची आग धनगरांच्या मनामध्ये पेटवली. आरक्षणाच्या जोरावर समाज आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगती करू शकतो हे सर्वप्रथम बापूसाहेबांनी समाजाच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनियर ची पदवी मिळवलेल्या बी.के कोकरे यांनी लाखो रुपयांची नोकरी मिळवली असती त्यांना आपलं जीवन ऐश आरामांमध्ये जगता आलं असतं कारण त्याकाळी ही पदवी मिळवणारे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बोटावरती मोजणी इतकीच लोक होते, आणि विशेष म्हणजे आजचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि बी.के कोकरे साहेब या दोघांनी एकाच वर्गात बसून केमिकल इंजिनियर ची पदवी घेतली. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की त्यांनी ठरवलं असतं तर ते स्वतःच असं खूप मोठ उद्योग विश्व निर्माण करू शकले असते.परंतु त्यांनी तसे न करता समाजासाठी त्यांनी आपल्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी वाहून घेतलं. 

उच्च शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, त्यांच्या आई- वडिलांनी बारामती नगरपरिषदेचा कचरा उचलायचं काम केलं व त्यातून मिळवलेल्या पैशातून बापूसाहेबांच उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे बापूसाहेबांना आपले शैक्षणिक आयुष्य जगत असताना आपल्या कुटुंबाची व धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव झाली होती.

उच्च शिक्षण घेत असताना धनगर समाजाचा राज्यघटनेमध्ये एस टी आरक्षणामध्ये समावेश आहे परंतु स्वातंत्र्यानंतर सरकारने या सवलती धनगरांना लागू केल्या नाही ही गोष्ट बापूसाहेबांना समजली. या सवलती समाजाला मिळाल्या तर समाज मुख्य प्रवाहामध्ये येऊन समाजाचा विकास होऊ शकतो ही गोष्ट बापूसाहेबांनी लक्षात घेतली आणि पुढील वाटचालीस सुरुवात केली. 

1985 मध्ये केमिकल इंजिनीयर ची डिग्री पूर्ण करून झोपलेल्या धनगर समाजाला जागृत करण्याचा विडा बापूसाहेबांनी उचलला.पुढील काळात त्यांनी दोन चाकी राजदूत गाडीवर अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. महाराष्ट्रात प्रवास करताना त्यावेळेस साहेबांच्या दोन चाकी गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नसायचे त्यावेळेस वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी घरातील दिव्यासाठी लावणाऱ्या चिमण्यातील रॉकेल पुरवले आणि त्याचा आधार घेऊन साहेब महाराष्ट्रभर फिरले. दर्या खोऱ्यामध्ये वाड्यावर त्यावरती विखुरलेल्या, मेंढरा मागे फिरणाऱ्या लाजऱ्या-बुजर्या आपल्या समाजाला कोणत्याही साधना शिवाय जागं करणे त्या काळात खूप मोठी अवघड गोष्ट होती परंतु हे काम साहेबांनी पुढील फक्त तीन वर्षात पूर्ण केलं(1988-1991) . 

या प्रवासात त्यांना महाराष्ट्रातील अनेक तरुण मित्रांची आणि समाज बांधवांची साथ लाभली व यांच्याच मदतीने त्यांनी 1988 मध्ये 

धूळदेवाच्या जत्रेत यशवंत सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. याच संघटनेच्या माध्यमातून साहेब घराघरात पोहोचले याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर लाखोंची मेळावे घेतले, घाट आढवले तत्कालीन सरकारला धडकी भरवणारे आणि घाम फोडणारी आंदोलने केली. बघता बघता बी के कोकरे साहेब महाराष्ट्रभर पोचले. महाराष्ट्रातील झोपलेला धनगर स्वातंत्र्यानंतर म्हणा किंवा यशवंतराव होळकर यांच्यानंतर बी.के कोकरे साहेबांनी पहिल्यांदा खडबडून जागा केला. त्यांच्या मनामध्ये क्रांतीची आग पेटवली. आपण देखील राज्यकर्ते जमात आहोत आपण देखील यशवंतराव मल्हार यांचे वारस आहोत याची जाणीव साहेबांनी समाजाला जाणीवपूर्वक करून दिली.

साहेबांनी महाराष्ट्र फिरत असताना गावागावात आपली माणसं तयार केली, साहेब कोणत्याही गावात गेले आणि भाषण करायला लागले तर लोक गहिवरून जात लोकांच्या अंगावरती शाहारे येत म्हातारी माणसं डोक्यावरील फेटा काढून अक्षरशः आनंदाने नाचत असत. एवढी ताकत बी.के कोकरे साहेबांच्या वाणीमध्ये आणि भाषणामध्ये होती, साहेबांनी अक्षरश महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या भाषणाने वेड लावलं होतं. धनगर समाजामध्ये लहान थोरांच्या ओठावरती फक्त आणि फक्त बी.के कोकरे हेच नाव होतं. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्याकाळी आज सारखे कुठलंही समाज माध्यम - फेसबुक व्हाट्सअप, न्यूज चैनल, पैसा व वाहने काहीही नव्हत ही बाब आज आपण लक्षात घेतली पाहिजे. 

अथक प्रयत्न केल्यानंतर धनगर समाजाला एस टी आरक्षण पुढे दिसत असताना तत्कालीन मुजोर सरकार व राज्यकर्त्यांनी बी.के कोकरे आणि धनगर समाजाची चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखला. त्यांना धनगर समाज जागा होत असल्याचं प्रकर्षाने निदर्शनास आलं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. महाराष्ट्रातील एवढा मोठा धनगर समाज जर जागा झाला तर आपलं राजकीय अस्तित्व संपवेल आपल्या सत्तेला तडा जाईल याची प्रस्थापितांना जाणीव झाली.

बी के कोकरे साहेबांना चळवळ थांबविण्याच्या धमक्या येऊ लागल्या.यशवंतना काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या धमक्या येऊ लागल्या. साहेबांबरोबर काम करणाऱ्या समाजाच्या लोकांना फोडण्यात येऊ लागलं आमदार खासदार मंत्री पदाच्या ऑफर देऊन साहेबांपासून लोकांना दूर केलं जाऊ लागलं. धनगर समाजाबरोबर जे काम हे प्रस्थापित लोक आज करत आहेत त्याच पद्धतीचे काम या लोकांनी त्यावेळेस केलं आणि समाज फोडला आणि पुढील येणाऱ्या अनेक पिढ्यांचे नुकसान या प्रस्थापित आणि विशेष म्हणजे बारामतीच्या प्रस्थापित नेत्याने केलं आणि आज देखील ते अशाच पद्धतीने समाजाबरोबर खेळ खेळत आहे.

अंतिम समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी, धनगरांची चळवळ संपवण्यासाठी आणि धनगरांना एस.टी आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी पंढरपूरला धनगरांचा शासन पुरस्कृत मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यामध्ये बी.के कोकरे साहेब आणि समाजाला फसवून एन टी च 3.5% आरक्षण देण्यात आलं आणि बी के कोकरे साहेबांच्या परस्पर यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची घोषणा करण्यात आली.

ही चळवळ मोडीत काढण्यास तत्कालीन नीच राज्यकर्त्यांबरोबरच आपल्या समाजातील काही समाजकंटक देखील कारणीभूत आहेत नंतर त्यांना आमदारकी मंत्री पदे वगैरे मिळाली असतील परंतु त्यांची आज अवस्था केविलवाणी आहे.

ह्या लोकांनी फक्त बी के कोकरे साहेब यांनाच संपवलं नाही तर धनगरांच्या पुढे येणाऱ्या अनेक भावी पिढीला संपवल. पुढे या चळवळीच्या जोरावर तयार होणाऱ्या आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आय ए एस, आय पी एस आणि एकंदरच महाराष्ट्रात राज्यकर्ते जमात होणाऱ्या धनगर समाजाला संपवलं.

धनगर समाजाला जे एन टी आरक्षण मिळालं ते आरक्षण शरद पवार या माणसाने दिल असं सांगितलं जातं परंतु हे साफ चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे कारण बी.के कोकरे साहेबांनी चळवळ जर उभी केली नसती तर समाजाला कदापिही एन.टी च आरक्षण मिळाल नसत. 

समाजाला एन.टी च स्वतंत्र आरक्षण मिळाल्यामुळे 1990 नंतर या आरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये लाखो लोक शासकीय नोकरीमध्ये लागले लाखो विद्यार्थी स्कॉलरशिप घेऊ लागले. अनेक जण इंजिनीयर डॉक्टर मोठे अधिकारी झाले. तसेच विविध पातळीवरती आरक्षणाचा फायदा होऊ लागला ही आपल्यासाठी बी के कोकरे साहेबांची खूप मोठी देन आहे हे समाजाने विसरता कामा नये.

 एवढेच नाही तर समाज वेळोवेळी मोठ्या ताकदीने सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये उभा राहिला याचा पाया देखील क्रांतीसुर्य बी के कोकरे यांनी तयार केला त्याचीच प्रेरणा घेऊन समाजात आज अनेक नेते तयार झाले.

चळवळीतून बाहेर पडल्यानंतर बी के कोकरे प्रचंड निराशेत गेले. कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून आणि आपल्या जीवनाची राख रांगोळी करून समाजासाठी घराबाहेर पडलेला वाघ यां नीच प्रवृत्तीच्या प्रस्थापितांनी संपवला. साहेबांची चळवळ संपल्याने समाजाचे झालेलं नुकसान पुढील शंभर वर्षात भरून निघेल का नाही याची शाश्वती नाही.

कारण बी के कोकरे यांना संपवलेली तात्कालीन प्रस्थापित पिलावळ आज देखील समाजात त्याच पद्धतीने डाव खेळत आहे. समाजाला फोडा आणि राज्य करा असा डाव टाकत आहे आपल्यातील अनेक मंडळी त्याच्या वळचणीला जाऊन आज देखील बळी पडत आहेत.ह्या लोकांना आज देखील हे समजत नाही ज्याने आपल्या अनेक भावी पिढ्या संपवल्या तो आपल्याला काय देणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

समाजाला जर न्याय मिळवायचा असेल, समाजाला राज्यकर्ती जमात बनवायचे असेल आणि खऱ्या अर्थाने बीके साहेबांना आदरांजली वाहून त्यांचा लढा पूर्ण करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा प्रामाणिकपणे एकत्र यावं लागेल आणि लढावं लागेल.

 *लेखक* 

 *विशाल बापूसाहेब कोकरे*

( *क्रांतीसुर्य बी.के कोकरे* साहेबांचे चिरंजीव) 

Post a Comment

0 Comments